
आदिवासी तरुण वळला उद्योगाकडे
(महान्यूज) गुरुवार, १६ जुलै, २००९
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुटीर उद्योगासारखे अनेक जोडधंदे केले जातात. त्यामध्ये
कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन यासारख्या व्यवसायांचा समावेश होतो.
मात्र, कुटीरउद्योगाकडे जोडधंदा म्हणून न पाहता प्रमुख उद्योगाच्या दृष्टीने
पाहिल्यास त्यातून स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो. हाच दृष्टिकोन ठेवून नाशिक
जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये मोहणदरी येथील सुशिक्षीत आदिवासी तरुण विलास रंगनाथ
चव्हाण याने नोकरीच्या पाठीमागे न लागता इमु पालन हा स्वत:चा व्यवसाय उभारला आहे.
सध्या कमी भांडवलात चांगले उत्त्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून शहामृग (इमू)
पालनाकडे पाहिले जात आहे. शेती बरोबरच जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उपयुक्त आहे.
मात्र, पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिल्यास ते उदरनिर्वाहाचे चांगले साधन
बनू शकते. या व्यवसायातील यशामुळे आदिवासी तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत.
विलास चव्हाण यांच्या आईच्या नावावर शेती होती. मात्र ती कोरडवाहू असल्याने त्यातून
वर्षाला जेमतेम १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. त्यातून त्यांचा केवळ
उदरनिर्वाह होत असे. आदिवासी विकास विभागामार्फत १९९२ मध्ये त्यांच्या आईला १००
टक्के अनुदानावर विद्युत पंप मिळाला. त्यामुळे त्यांची शेती बागायती झाली. बागायती
शेतीद्वारे चव्हाण यांनी कांदा, मिरची, टोमॅटो ही पिके घेवून त्यातून दीड ते दोन
लाख रुपये उत्पन्न मिळवले. त्यानंतर शेतीला जोडधंदा म्हणून एखादा उद्योग व्यवसाय उभा
करण्यासाठी चव्हाण हे मार्ग शोधू लागले.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या विभागाकडून त्यांना
मदतीचा हात मिळाला. कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क
साधून त्यांनी इमू पालन व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी अर्ज केला. आदिवासी
विकास प्रकल्प कार्यालयाने चव्हाण यांना 'न्युक्लिअस बजेट'मधून इमू पालनासाठी २ लाख
४१ हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर केले.
या अर्थसहाय्यातून चव्हाण यांनी शहामृगाच्या १० जोड्या खरेदी करुन त्यांचे संगोपन
करायला सुरुवात केली. इमूच्या एका अंड्याची किंमत १३०० ते १५०० रुपये असते. इमूचे
अंडे देण्याचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च असतो. या वर्षी त्यांना अंड्यापासुन सुमारे
२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले. इमू (शहामृग)
हा पक्षी आपल्या भारतातील वातावरणाला जुळवून घेणारा म्हणजेच सात ते पन्नास
दरम्यानच्या तापमानाला राहू शकणारा पक्षी आहे. इमू हा माणसाळलेला पक्षी असून तो ५-६
फुट उंच असतो. परीपक्व झालेल्या जोडीकडून प्रती वर्षी सरासरी ३० ते ४० अंडी मिळतात
व ही अंडी २५ वर्षापर्यंत मिळत राहतात. यात पहिल्या वर्षी १५ ते १८, दुसर्या वर्षी
१८ ते २०, तिसर्या वर्षापासून २५ ते ४० अंडी मिळायला सुरुवात होते. या पक्ष्याचे
आयुर्मान साधारणता ४० वर्षापर्यंत असते.
ओसाड माळरानावरती हा पक्षी अतिशय चांगल्या पध्दतीने राहू शकतो. इमू फार्मसाठी
मूरमाड, हलक्या प्रतीचे, पाण्याचा निचरा होणारे, गोंगाट व वर्दळ नसणारी अशी किमान
१० गुंठे जागा ५०x२०० फुट या प्रमाणात लागते. ही जागा कुंपणाने बंदिस्त केली जाते.
पक्ष्याच्या शरीराच्या आकारमानानुसार त्याला लागणारे खाद्य अगदीच साधारण आहे. शिवाय
याला माणूसबळही कमी लागते. तो कोणत्याही रोगाला सहजासहजी बळी न पडणारा असल्याकारणाने
औषधांसाठी होणारा खर्च अगदीच नगण्य आहे. शिवाय या पक्ष्यासाठी विम्याचे संरक्षण
मिळत असल्यामुळे या व्यवसात धोका राहिलेला नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवापासून
उत्पन्न मिळणारा, खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारास वाव असणारा आणि शेतीला पूरक असणारा
हा व्यवसाय आहे.
नाबार्डने देखील या व्यवसायाचा अभ्यास करुन कृषी पुरक व्यवसाय म्हणून त्याला मान्यता
देऊन 'व्हेंचर कॉपिटल'मध्ये त्याचा समावेश केला आहे. इमूची अंडी खरेदी करण्यासाठी
बारामती, पुणे, हैद्राबाद, विशाखापट्टनम या ठिकाणी किमान तीन वर्षांचा करार केला
जातो. मादीची अंडे देण्याची क्षमता २५ ते ३० वर्षापर्यंत असते. या पक्ष्याच्या
मांसाचा भाव ४०० ते ६०० रुपये प्रति किलो असून त्याची कातडीही चांगल्या भावाने विकली
जाते. त्याच्या चरबीपासुन काढलेले तेल औषधोपचारासाठी उपयुक्त असते. त्यास बाजारात
चांगली मागणी आहे. इमूपालन व्यवसाय हा पोल्ट्री अथवा दुग्ध व्यवसाय यांच्यापेक्षाही
फायदेशीर व कमी श्रमाचा आहे. सुशिक्षीत बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता
इमूपालनाचा व्यवसाय करायला हवा. आदिवासी तरुणांसाठी हा व्यवसाय उदरनिर्वाहाचे एक
चांगले साधन असून त्यासाठी असणार्या शासकीय मदतीचा लाभ घेवून आदिवासी तरुणाने या
उद्योगात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.